मुंबई, 23 ऑगस्ट: हरियाणातील भाजप नेत्या, टिक टॉक स्टार अभिनेत्री सोनाली फोगट यांचं आज गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सोनाली या 42 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर शोककळा निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सोनाली यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सोनाली यांना हार्ट अटॅक आला की त्यांचा घातपात करण्यात आला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. दरम्यान गोवा पोलिसांनी सोनाली यांच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट दिली आहे.
सोनाली यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूवेळी सोनाली यांच्या शरिरावर कोणत्याही प्रकारच्या दुखापतीच्या खुणा आढळून आल्या नाहीत, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून सोनाली यांचा शॉर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरच मिळेल अशी महत्त्वाची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.