Jharkhand Chief Minister won Majority Test : झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालट झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. सरकारच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. विरोधी पक्ष भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला.झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे सुमारे ३० आमदार रायपूरला गेले होते. सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना ३० ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व आमदारांबरोबर काल (रविवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वास ठरावाबाबत चर्चाही केली होती.भाजपकडूनही रविवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदारांना अनेक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच भाजपच्या सर्व आमदारांना अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले होते. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनीसुद्धा भाजपाची रणनीती ठरविण्यासाठी आज सकाळी नऊच्या सुमारास बैठक घेतली होती. मात्र, एवढ्या प्रयत्नानंतरही भाजपाला ‘वॉक आऊट’ करावं लागल्याचं दिसून येत आहे.