पीटीआय, नवी दिल्ली : नव्या संसद भवनावर सोमवारी मोदींनी अनावरण केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या स्वरूपाला विरोधी पक्षाचे नेते आणि काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी विरोध व्यक्त केला. त्यात त्वरित बदल करण्याची मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली. सारनाथ येथे सम्राट अशोकांच्या काळात उभारलेल्या चार सिंहांचे चिन्ह आपले राष्ट्रीय मानचिन्ह आहे. डौलदार व आत्मविश्वासाचे प्रतीक असलेल्या सिंहांच्या जागी धडकी भरवणाऱ्या आक्रमक सिंहमुद्रा उभारून या मूळ राष्ट्रचिन्हाचे विकृतीकरण नव्या संसदभवनावरील मानचिन्हाच्या रूपाने झाले आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून, सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटले आहे, की नरेंद्र मोदीजी या नव्या मानचिन्हातील सिंहांचा चेहरा नीट पाहावा. ते महान सारनाथ येथील सिंहांच्या मूर्तीची प्रतिकृती वाटतात, की गीरच्या सिंहांचे विकृत रूप त्यांच्यात दिसते, ते तपासा अन् फरक जाणवल्यास त्यात बदल करा.