देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल, ‘ही’ आहेत लक्षणं

आरोग्य

गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात दाखल झाली होती. या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.


मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग १९५८ मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा इंक्यूबेशन काळ ( संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ ) साधारणतः ७ ते १४ दिवसांचा असतो. मात्र तो५ ते २१ दिवसांपर्यंत वाढू शकतो, असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *