तब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत दाद मागू शकतात. तसेच राऊतांना ईडी कोठडी सुनावली जाऊ शकते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे.“ईडी जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास करते तेव्हा त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा असतो. याच पुराव्याच्या आधावर ईडीकडून कारवाई केली जाते. जेव्हा ईडीला सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध झालेला असतो, तेव्हाच ईडी एखाद्या आरोपीला ताब्यात घेते,” असे उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला सांगितले.“ईडीकडून अचानकपणे नव्हे तर टप्प्या टप्प्याने कारवाई केली जाते. एखाद्या व्यक्तीविरोधात पुरावा आहे याची खात्री झाल्यानंतरच ईडीकडून अटकेची कारवाई केली जाते. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला कोठडी मिळावी यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जातात. त्यानंतर कोठडीमध्ये ईडीकडून आरोपीला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. ईडीकडे जो पुरावा आहे, त्या पुराव्याबद्दलच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न ईडी करते,” अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.“कुठल्याही व्यक्तीला ईडी जेव्हा ताब्यात घेते, तेव्हा आरोपीला २४ तासांच्या आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागते. तिथे ईडी कस्टडी मागते. याच ठिकाणी ईडी कस्टडी मिळू नये अशी मागणी आरोपी करु शकतो. माझ्याकडील सर्व माहिती त्यांनी अगोदरच घेतलेली आहे. आता माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, हे पटवून देण्यास आरोप यशस्वी ठरला, तर मग न्यायदंडाधिकारी कोठडी नाकारु शकतात,” असेही निकम यांनी सांगितले.