तेल्हारा : विनायक मेटे जेव्हा मराठा महासंघाचे काम करत होते तेव्हापासून तेल्हारा शहरासह तालुक्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे तेल्हारा शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त हाेत आहे. मराठा समाजाच्या चळवळीतला एक योद्धा आपल्यातून निघून गेल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे १४ ऑगस्टला सकाळी अपघाती निधन झाले. विनायकराव मेटे जेव्हा मराठा महासंघाचे काम करत होते, तेव्हा शहरासह तालुक्यामध्ये त्यांनी अनेक दौरे केले, सभा घेतल्या. त्यांच्या निधनामुळे मराठा चळवळीची न भरून निघणारी हानी झाली, अशा शब्दात प्रहार जनशक्ती प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. अकोट-तेल्हारा उपविभागातील ५२ नदी नाल्याचा प्रश्न एका निवेदनावर विधान परिषदेत मांडून सरकारला प्रथम जाब विचारणारे नेते अचानक निघून जाणे धक्कादायक असल्याचे बाळासाहेब सावरकर म्हणाले. मेटे यांनी तेल्हारा शहरात चार सभा घेतल्या, अशी आठवण माजी तालुकाध्यक्ष मराठा महासंघ तेल्हारा राजेश खारोडे केली. विनायक मेटें मुळे संघटनेचे कामही केले होते, अशी आठवण तेल्हारा विकास मंचचे रामभाऊ फाटकर यांनी केली.