गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई महानगर पालिका निवडणुका यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. भाजपाकडून शिवसेनेविरोधात वरळीत हे शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जात असताना स्थानिक शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. गिरगावमधील दहीहंडी उत्सवात आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
आशिष शेलार यांची वरळीबाबत विधानं…
वरळीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या काही विधानांचा संदर्भ आहे. आशिष शेलार यांनी विधानभवनात बोलतानाच वरळीबाबत “आम्ही गड वगैरे काही मानत नाही, आदित्य ठाकरे स्वत: आमच्या मतांच्या जिवावर निवडून आले आहेत”, असं म्हणत या वादाला तोंड फोडलं. यानंतर सचिन अहिर यांनी देखील आशिष शेलार यांना खुलं आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवून जिंकून यायला सांगितलं आहे. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली आहे.