देवेंद्र फडणवीसांची ‘शोले’ स्टाईल फटकेबाजी; ‘कितने आदमी थे?..50 निकल गए’ म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra State

मुंबई 20 ऑगस्ट : आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोध पक्ष सातत्याने करत आहे, यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. मात्र, पालिका निवडणूका जवळ आल्या की यांचे असे डायलॅाग सुरू होतात.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुनही राजकीय नेते त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यावर फडणवीस म्हणाले, ‘मी सांगतो मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण आम्ही सांगतो की महाराष्ट्राच्या विकासासाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाणार.’ यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी डायलॅागमधून आधीच्या ठाकरे सरकारला टोला लगावला. ते म्हणाले, ‘मला अमिताभ बच्चन म्हटलं गेलं पण माझ शरीर हे अमजद खानसारखं आहे. मात्र, मी डायलॅाग बोलू शकतो. “कितने आदमी थे? 65 मै से 50 निकल गए !”’काल दहिहंडी जोरात आणि उदया सर्व गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सर्वकाही जोरात होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरेंना टोला लगावत फडणवीस म्हणाले, की ‘मुख्यमंत्रीही घरी बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही’.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की केंद्रीय भाजपा नेतृत्वाने बिनीचा शिलेदार म्हणून आशिष शेलार यांना जबाबदारी दिली आहे आणि भगवा फडकवण्यास सांगितलं आहे. आता मुंबई पालिकेवर भाजपा-सेनेचा महापौर बसेल. मात्र, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातील एकनाथ शिंदेंची सेना आहे. आशिष शेलार २०-२० कशी खेळतात तुम्हाला माहीतच आहे. म्हणून हा सामना तुम्ही जिंकणार आहात. मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे.

एखाद्या सामन्यात फुटबॅाल आला तर त्याला कशी किक मारायची तुम्हाला माहीत आहे. कोणी जास्त उडया मारत असेल तर त्याची दोरी कशी ओढायची हे तुम्हाला माहीत आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *