“’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा

देश – विदेश

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपात प्रवेश केल्यास त्यांच्यावरील सर्व खटले बंद करण्यात येतील, अशी ऑफर भाजपाने दिली असल्याचे धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.सिसोदिया यांनी ट्वीट करत भाजपाकडून ऑफर आल्याचे म्हटले आहे. ”आप सोडून भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय, ईडीची सर्व प्रकरणे बंद होतील. मात्र, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचं ते करा.”, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी, दिल्लीतील पत्रकार परिषदेत सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, ”मी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुजरातला जात आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने काम झाले आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहून प्रभावित झालेल्या गुजरातच्या जनतेने केजरीवाल यांना संधी देण्याचे ठरवले आहे, असेही ते म्हणाले.दरम्यान, सीबीआयने सिसोदिया यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केल्याची माहिती होती. मात्र, यावर सीबीआयकडून स्पष्टीकरण देत प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे. यावरूनही सिसोदियांनी भाजपावर निशाणा साधला. ”मोदीजी मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय. मात्र, तुम्ही मला शोधू शकत नाही का?”, असे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *