वर्गात शिक्षकांचे फोटो लावून सरकार काय साध्य करणार

अकोला


अकोला : शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर वाढावा यासाठी तसेच अनेक शाळांमध्ये बदली म्हणून नकली शिक्षक शिकवत असतात. या गोष्टीला आळा बसवण्यासाठी आमचे गुरूजी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून लवकरात लवकर संबंधित शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयाला मात्र विदर्भ मुख्याध्यापक संघाने विरोध दर्शवत वर्गात शिक्षकांचे फोटो लावून सरकार काय साध्य करणार आहे, असे म्हणून सरकारच्या या मोहिमेचा निषेध केला आहे.
विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर म्हणाले की, गुणवत्ता वाढवणे महत्वाचे आहे; मात्र हे काम बाजूला ठेवून भलत्याच गोष्टी लादण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी नेते, देवदेवता यांचे फोटो काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता शिक्षकांचे फोटो कशासाठी? गुरुजींना गुंतवून ठेवण्याचा हा कार्यक्रम आहे. या परिपत्रकाला आमचा विरोध आहे, हे योग्य नाही. गुणवत्तेचा कार्यक्रम हाती न घेता फोटो लावण्याचा फाजील कार्यक्रम सरकारने सुरू केला आहे, सरकारची ही मोहीम शिक्षकांवर अविश्वास दर्शवणारी आहे. सगळेच शिक्षक काही कामचुकार नाहीत. शिवाय जे शिक्षक कामचुकार आहेत, असे जे म्हणणे आहे, ते चुकीचे आहे. शिक्षण विभागात विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्यामार्फत दांडी मारणाऱ्या शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेतच. मात्र सरसकट सगळ्याच शिक्षकांना एकाच नजरेने पाहणे चुकीचे आहे. वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा प्रकार हा शिक्षकांवर अविश्वास दाखवण्यासारखा आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध राहील. वास्तविक सरकारने शिक्षकांना विश्वास दिला पाहिजे. मात्र सरकारची धोरणे शिक्षकांचे खच्चीकरण करणारे आहे. राज्यात हजारोंच्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्या जागा भरण्याऐवजी सरकार मूळ विषयांना बगल देत आहे. मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सरकारकडून शिक्षकांविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारच्या या मोहिमेचा निषेध आहे, अशी भूमिका विदर्भ मुख्याध्यापक संघाने घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *