देशात वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ईडी चौकशीवरुनही त्यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे.“काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपाने कणा मोडला. केवळ दोन उद्योपतींनाच मोठं करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात आहेत. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.“५५ तास मला ईडीच्या कार्यालयात बसवलं. पण मी मोदींना सांगू इच्छितो मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला ५०० तास जरी ईडीच्या कार्यालयात बसवलं तरी मला फरक पडत नाही. हा देश संविधान आहे. जर आपण याविरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही”, असंही राहुल गांधी म्हणाले.