३ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील एका उद्यानात पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका १० वर्षीय मुलावर हल्ला केला होता. संबंधित कुत्र्याने मालकाच्या हातातून स्वत:ची सुटका करून घेत, या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या महिन्यात गाझियाबादमधील लोणी येथे सहा वर्षांच्या चिमुरडीला आणि गुडगावमध्ये एका महिलेला पिटबुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर जुलै महिन्यात लखनऊमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला करत तिला जखमी केलं होतं. पिटबुल जातीचा कुत्रा माणसांवर हल्ला का करतो? यामागची नेमकी कारणं कोणती आहेत, याचं विवेचन करणारा लेख…
पिटबुल कोणत्या प्रकारचा कुत्रा आहे?
प्राणी हक्काचं संरक्षण करणाऱ्या PETA संस्थेने या वर्षी जुलैमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. संबंधित पत्रात त्यांनी पिटबुल हे धोकादायक जातीचं कुत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या आक्रमक स्वभावामुळे लोकांनी पिटबुलसारखे कुत्रे पाळायला सुरुवात केल्याचंही पत्रात म्हटलं होतं. मूळात पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या उत्पत्ती ‘बुल अँड बेअर बायटींग’ या खेळ प्रकारातून झाली आहे. ‘बुल अँड बेअर बायटींग’ हा एक मनोरंजनाचा खेळ असून यामध्ये कुत्र्याला बंदिस्त बैल किंवा अस्वलावर हल्ला करण्यास प्रवृत्त केलं जातं. ‘बुल अॅंड बेअर बायटींग’ हा इंग्लंडमधील एक खेळाचा प्रकार होता, १८३५ साली यावर बंदी घालण्यात आली आहे.