वीज मीटरमध्ये छेडछाड करणारे तिघे कर्मचारी बडतर्फ

अकोला ब्रेकिंग

वीज मीटरमध्ये छेडछाड करणारे तिघे कर्मचारी बडतर्फ
लेखा एंटरप्राईजेसची तडकाफडकी कारवाई : मीटर रिडींग करणाऱ्यांची तातडीची बैठक

अकोला : वीज मीटरमध्ये छेडछाड करणारे तिघे कर्मचारी तातडीने बडतर्फ करण्याची कारवाई लेखा एंटरप्राईजेच्या संचालकांनी केली आहे. सोबतच अकोट परिसरात मीटर रिडींगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्यात. दहीहांडा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या केळीवेळी येथे वीज मीटरमध्ये छेडछाड करण्याच्या आरोपात शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखडे या तिघांविरूध्द ३० मे रोजी पोलिस तक्रार दाखल झाली. उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली गेली. फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या तिघांनी, वीज ग्राहकाकडून शंभर रूपये घेऊन ही छेडछाड केल्याचा आरोप समोर आला. ३० मे रोजी पोलिस कारवाई होताच लेखा एंटरप्राईजेसने तिघांविरूध्द तडकाफडकी कारवाई केली आहे. लेखा एंटरप्राईजेने स्वखर्चाने पारदर्शकतेसाठी खराब झालेल्या मीटरचे बॉक्सेस कापून घेतले आहेत. अकोट परिसरातील मीटर रिडींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना, कायद्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे निर्देश लेखा एंटरप्राईजेने दिले.

लेखाचे अनेक मीटररिडर आहेत. कर्तव्यावर असताना कर्मचारी काय करतात, हे सांगता येत नाही. नैतिकतेचे कोणतेही मापदंड नाही. कौटुंबिक संस्कारातून ते झिरपत येत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या गुन्हेगारी किंवा फसवणुकीला कंपनी जबाबदार असू शकत नाही.

  • दीपक उपाध्याय,
    लेखा एंटरप्राईजेस, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *