कन्यादान आणि हळवे पालकमंत्री

अकोला ब्रेकिंग

अकोला, ता.१३ मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो. नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात. आज अशाच एका हळव्या प्रसंगात पालकमंत्री बच्चू कडू पहावयास मिळाले. एरवी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे पालकमंत्री याठिकाणी खूपच हळवे आणि भावूक भासत होते. मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात ते यासाठीच!

चि.सौ. कां. दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे रा. व्याळा ता. बाळापूर आणि आई प्रमिला ह्या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली.  तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते.

तिचे मेव्हणे व मामा ह्यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले.  कंचनपूर ता. खामगाव जि. बुलडाणा चे विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण ह्यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. व्याळ्या जवळच हॉटेल मराठा चे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न पार पडले.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले; त्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्या सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. पित्याच्या मायेने जावई आणि लेक यांना आहेर केला. शुभाशिर्वाद देऊन मगच पालकमंत्री सोहळ्यातून बाहेर पडले.

या विवाह सोहळ्यासाठी हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत, अमोल जमोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे ही सेवाभावी मंडळी घरचं कार्य असल्याप्रमाणे सगळं हवं नको ते पहात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *