“आडनावावरून जात गृहित धरणं चुकीचं”- नाना पटोले

ताज्या घड्यामोडी

राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे. पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
“ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी (डाटा) जमा होईल यात लक्ष घालावे,” असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *