ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नको, खंबीर पावलं उचला, मुंडे भावंडाची ठाम भूमिका

Maharashtra State

बीड : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणं राज्य निवडणूक आयोगानं कमी पाऊस असलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकसारखी भूमिका घेतलीय. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी देखील यावर ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की,”काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भूमिका जाहीर केली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी राजकीय आरक्षण मिळणार का हे पाहणं आवश्यक आहे.महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. ही लढाई अंतिम टप्प्यात असताना निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये अशी आमची विनंती आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली आहे. भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *