प्रासंगिक वार्ता : पावसाळा सुरू झालाय… पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. सध्या ‘टाइफॉइड’ची साथ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेलंगणाच्या एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणात टायफॉइडच्या रुग्णांची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात पाणीपुरी खात असाल तर सावधान.
पावसाळ्याच्या दिवसात पाणीपूरी ‘टाइफॉइड’ आजाराचं कारण असल्याचं प्रत्येक डॉक्टर सांगत असतात. त्यामुळे ते नागरिकांना पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला देत असतात.
रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवर अनेक सुक्ष्म किटक असतात. त्यामुळे ते किटक नकळत आपल्या पोटात जातात आणि ‘टाइफॉइड’ यांसारखे साथीचे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ न खाण्याचा सल्ला आज प्रत्येकजण देत असते. ‘तुम्हाला पाणीपुरी 10-15 रुपयांना मिळू शकते, पण उद्या तुम्हाला उपचारासाठी 5 हजार ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील. विक्रेत्यांनीही स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर करावा’
एवढंच नाही तर, तेलंगणात यंदाच्या वर्षी ‘टाइफॉइड’चे रुग्ण वाढल्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मे महिन्यात 2 हजार 700 तर जूनमध्ये 2 हजार 752 ‘टाइफॉइड’च्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती डॉ. श्रीनिवास राव यांनी दिली. शिवाय अशुद्ध पाणी, डास आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे मलेरिया, तीव्र अतिसार आणि ताप-सर्दी यांसारखे आजार डोकं वर काढत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील बाहेरचे पदार्थ खात असाल तर टाळा.