महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ
वीज ग्राहकांना भरावे लागेल मोठे वीज बिल
महावितरणच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांचे निदर्शने

अकोला : महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही शुल्कवाढ रद्द करून दिल्ली आणि पंजाब राज्याप्रमाणे जनतेला 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
वीजबिलात इंधन समायोजनाच्या नावाखाली ग्राहकांवर महागाईचा अधिक बोजा टाकला जात आहे. त्यामुळे येणारे लांबलचक वीजबिल नागरिकांच्या त्रासात भर घालणार आहे.नुकतीच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या इंधन समायोजन शुल्क वाढीला मान्यता दिली आहे. इंधन समायोजन शुल्कवाढ रद्द करून राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकारप्रमाणे 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात 300 युनिटपर्यंतची वीज 30 टक्के स्वस्त करावी. आदी मागण्यांबाबत आम आदमी पार्टी अकोला शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.