मुंबई : टोकियो ऑलिम्पिकनंतर महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील घरी परतला. घरातून थेट शेतात कामासाठी गेला. शेतात राबला. पण अविनाशला करोना झाला. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसीक चक्रात तो अडकला होता. पण आता जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. अविनाशने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.याबाबत अविनाशने सांगितले की, ” ऑलिम्पिकनंतर मी घरीच राहिलो. मी थोडीफार शेती केली. मला कोविड असल्याने मी चांगले करू शकलो नाही. माझ्यात खूप कमजोरी होत्या. मला वाटले की मी ८:३० (८ मिनिटे आणि ३० सेकंद) धावू शकत नाही. एका क्षणी मला वाटले की मी ऑलिम्पिकमधून माघार घेईन पण सरांनी (प्रशिक्षक) मला सांगितले की ऑलिम्पिकमध्ये धावणे महत्त्वाचे आहे. संधी मिळाली तर ती का घेऊ नये. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याचा मला विश्वास नव्हता. पण आता मात्र माझ्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे जातगिक स्पर्धा ही माझ्यासाठी महत्वाची असेल आणि पूर्ण ताकद लावून मी या स्पर्धेत उतरणार आहे.”
अविनाशला करोना झाला. त्यानंतर त्याचे पाय जड झाले होते. जवळपास तीन महिने त्याने कोणतेच काम केले नाही. सकाळी धावण्यासाठी जाणे देखील त्याला कठीण वाटत होते. त्यामुळे साबळे कुटुंबियांना अविनाशची काळजी वाटू लागली होती. अविनाश पुन्हा धावू शकणार की नाही, ही भिती त्यांनी सतावत होती. अविनाश दिवसभर शेतात असायचा, त्यामुळे तो एकटा पडत चालला आहे, असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. अविनाशला सराव सुरु करायला होता, पण त्यासाठी मानसीक दुष्टचक्रातून तो बाहर पडत नव्हता. पण ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय सराव शिबीर सुरु झाले, त्यामध्ये अविनाश गेला. त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अविनाश ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच उतरला होता. या स्पर्धेत अविनाशने राष्ट्रीय विक्रम रचला आणि तो पुन्हा लयीत आला. अविनाशसाठी हा एक चमत्कारच होता. आता जागतिक स्पर्धेत पदक जिंकत इतिहास रचण्यासाठी अविनाश सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.