अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कार्तिक काशीनाथ कारागीर (वय २४, रा. उत्तमनगर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी कार्तिकने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेले होते. त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास करुन कार्तिकाल अटक केली. त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली होती.
या खटल्यात सरकार पक्षाकडून हेमंत मेंडकी यांनी बाजू मांडली. पीडीत मुलीचा जबाब तसेच आरोपीचा वैद्यकीय तपासणी अहवाल खटल्यात महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी कार्तिकला दहा वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.