शिंदे-फडणवीसांची ‘आशिकी’ सत्तेची, त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आणि ही ‘लव्हस्टोरी-२२’…”; शिवसेनेची फिल्मी टीका

Maharashtra State

“‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’वरच भागवावे लागले.”

शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय रद्द पुन्हा नव्याने निर्णय प्रक्रिया सुरु केल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ठ असल्याने वेळ काढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच निर्णय घेत आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करताना अनेक चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करत शिवसेनेनं टीका केलीय. त्याचप्रमाणे फडणवीस-शिंदे यांचे सरकार म्हणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे. ही त्यांची बतावणी म्हणजे ढोंग आहे, असंही शिवसेनेनं म्हटलंय.
निर्णयांना स्थगिती देण्याचे पोरखेळ सुरू
“महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अधिकारावर आहेत, पण ज्याला सरकार म्हणावे अशी व्यवस्था पंधरा दिवसांनंतरही निर्माण होऊ शकली नाही. फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्रात कुणीही ‘सुपर सीएम’ नाही. शिंदे हेच सगळ्यांचे नेते’. अर्थात या सगळ्यांच्या नेत्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात टांगणीला लागले आहे. फडणवीस-शिंदे सरकारच्या असंख्य गमती-जमतींची चेष्टा होऊ लागली आहे. त्या गमती-जमतींचेही अजीर्ण होऊ लागले आहे. ठाकरे सरकारने घेतलेले काही निर्णय ‘असंविधानिक’ असल्याचे सांगून त्या निर्णयांना स्थगिती देण्याचे पोरखेळ सुरू झाले आहेत,” असा टोला शिवसेनेनं सध्याच्या शिंदे सरकारकडून सुरु असणाऱ्या निर्णयांबद्दल बोलताना लगावण्यात आलाय.

“ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर केला. या प्रस्तावांना फडणवीस-शिंदे सरकारने ‘बेकायदेशीर’ वगैरे ठरवून स्थगिती दिली व लोकांनी याबाबत धारेवर धरताच पुन्हा एकदा हे प्रस्ताव मंजूर केले. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव सध्याचे दोन स्तंभी सरकार कोणत्या आधारावर बेकायदेशीर मानतेय? ठाकरे सरकारने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला तेव्हा सरकारकडे बहुमत होतेच. शिंदे गटात बेडूकउड्या मारून पोहोचलेले काही मंत्रीसुद्धा त्या बैठकीत हजर होते. मंत्रिमंडळात हे ठराव एकमताने मंजूर झाल्यावरही विद्यमान सरकारला पोटदुखीने ग्रासावे हीच गंमत आहे,” असा चिमटाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून काढलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *