“आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”

Maharashtra State

“सर्वोच्च न्यायालयाचं कारण आहे तर मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं योग्य नव्हतं पण ती तर घेतली तुम्ही मग मंत्रीपदालाच काय अडचण आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद नवीन असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसत असल्याचं मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. अहमदनगरमध्ये पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकनाथ शिंदेंचा रिमोट आलाय असं वाटतं का? असा थेट प्रश्न थोरात यांना विचारला. त्यावर उत्तर देताना थोरात यांनी एकदम असं म्हणता येणार नाही असं सांगतानाच फडणवीस यांना पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव असल्याचंही अधोरेखित केलं.
“पत्रकार परिषद सुरु असतानाच फडणवीसांनी काहीतरी लिहून दिलं आणि त्यानंतर शिंदे बोलले. उद्धव ठाकरेंऐवजी त्यांचा रिमोट फडणवीसांच्या हातात गेलाय असं वाटतं का?” असा प्रश्न थोरात यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, “असं एकदम काही मी म्हणणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांना अनुभव आहे मुख्यमंत्री पदाचा. एकनाथ शिंदे हे नवीन आहेत. महिनाभर किंवा फार तर दोन महिने असं (मदत करणं) चालू शकतं,” असं थोरात म्हणाले.सध्या शिंदे मदत घेत असले तरी एक दिवस त्यांना आपणच मुख्यमंत्री असल्याचं सिद्ध करून दाखवावं लागेल असंही थोरात म्हणाले. “फार तर दोन महिने असं (मदत करणं) चालू शकतं पण एक दिवस तरी आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल. त्यांना हे जनतेला सिद्ध करुन दाखवावं लागेल, हीच सध्याची वस्तूस्थिती आहे असं मला वाटतं,” असं थोरात म्हणाले.“त्यांच्यामध्ये क्षमता आहे असं वाटतं का?” असा प्रश्न या उत्तरावरुन विचारण्यात आला असता थोरात यांनी हसून, “क्षमता ही दाखवावी लागते. ती आहे की नाही हे तपासण्याचं कोणतंही यंत्र नाहीय,” असं उत्तर दिलं. दोघेच जण निर्णय घेत असल्याच्या मुद्द्यावरुन, “मला कळत नाही की मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही,” असं थोरात म्हणाले.“मंत्रिमंडळाचा विस्तार करुन पालकमंत्र्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडे जबाबदाऱ्या देणं, जिल्ह्यांवर नियंत्रण ठेवणं ही गरज होती. त्यांनी मात्र तसा निर्णय घेतला नाही. याची कारण काय मला ठाऊक नाही. त्यांच्यातील आपसातील काही गोष्टी किंवा मेळ न बसल्याने हे झालं असावं,” असं थोरात यांनी म्हटलं.“(मंत्रीमंडळ विस्तार लांबवणीवर पडण्यामागे) सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगतात. सर्वोच्च न्यायालयाचं कारण आहे तर मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं योग्य नव्हतं पण ती तर घेतली तुम्ही मग मंत्रीपदालाच काय अडचण आहे?” असा प्रश्न थोरात यांनी शिंदे आणि फडणवीस यांना विचारलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *