नाशिक: मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले. ते शुक्रवारी नाशिकच्या मनमाड येथे शिवसंवाद यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणून हिणवले. चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपूत्राला खुर्चीवरून बाजूला करून त्याठिकाणी आपण बसायचे, गद्दारी करायची, त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसायचा, हा विचार त्यांच्या मनात का आला असेल, हाच प्रश्न मला परतपरत पडतो. त्यांचा नेमका विचार काय असेल, ते मला कळत नाही. ज्या माणसाने आपल्याला ओळख दिली, कठीण काळात आपल्याला साथ दिली, तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला, त्याच्यात पाठीत तुम्ही खंजीर का खुपसला, या प्रश्नाचे उत्तर मला द्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
गेली अडीच वर्षे मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना उद्धव ठाकरे साहेबांना काम करताना पाहिलं आहे. उद्धव साहेब दिवसातील २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे. यावरुन काहीवेळा मी आईकडे जाऊन भांडायचोही. मला हे त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण उद्धव ठाकरे सतत मिटिंगमध्ये, कामात व्यग्र असायचे. मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचा जायचो तेव्हा ते म्हणायाचे की, ‘कामाचं बोल, राज्याबद्दल बोल’, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दिवाळीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. तेव्हा मला एका परिषदेसाठी स्कॉटलंडला जायचे होते. मी त्यांना विचारले की, बाबा तुमचं ऑपरेशन आहे, मी स्कॉटलंडला जाऊ की नको? त्यावर उद्धव साहेब म्हणाले की, आदित्य माझी चिंता करु नकोस. तू महाराष्ट्राचा मंत्री आहेस, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.