-अजितदादांच्या पीएने नावासकट सांगितलं ‘कुणाला काय दिलं!’
मुंबई : राज्याचे ४ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सध्या विरोधी पक्षनेत्याची धुरा खांद्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांच्या वाढदिनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजित पवार यांच्या शिस्तीचे, वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. तसेच अजितदादांच्या राजकीय विरोधकांनी ते खुल्या दिलाने मांडले आहेत. चार आठवड्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतील आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड झाला. तब्बल ४० हून अधिक आमदारांपैकी निम्म्या आमदारांनी मविआ सराकरमध्ये निधी मिळत नसल्याचा आरोप केला. सार्वजनिक हिताची कामं प्राधान्याने करणं मग ते काम विरोधकाचं असेल तरी नियमाबाहेर जाऊन संबंधित कामाला मदत करणं, असं अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे. अजितदादांच्या याच व्यक्तिमत्वाचे किस्से सांगत त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी बंडखोर आमदारांचे निधी मिळत नसल्याचे आरोप नावासकट उडवून लावले आहेत. एकेकाळी दादांचे सहकारी राहिलेल्या परंतू राजकीय हेतूने प्रेरीत झाल्याने अचानक निधी बाबत व्यर्थ दोष देऊन दादांच्या बदनामीचे कारस्थान काही काळापासून घडत आहे. सहकाऱ्यांचीच काय पण विरोधकांची देखील सार्वजनिक हिताची कामं प्राधान्याने करणारे अजितदादांचे सहकारी, विरोधकांनी सांगितलेल्या काही आठवणींना आज उजळा देणे क्रमप्राप्त ठरते. “काय असेल ते असेल, वेळ प्रसंगी राज्याचे बजेट त्यावर खर्ची घालू, पण बच्चू कडू यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे”- अजित पवार