केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं. नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.“राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.“मला खूप वेळा राजकारण सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.