कंडोमचा वापर गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, मुचीपारा आणि बेनाचिती, सी झोन, ए झोनसह शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दुर्गापूर शहरामध्ये फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीमध्ये आश्चर्यकारकपणे वाढ झाली आहे. या कंडोमचा वापर तरुण नशेसाठी करत आहेत. कंडोम खरेदी करुन ते गरम पाण्यात भिजायला टाकले जात आहेत. त्यानंतर हे पाणी पिऊन तरुणांकडून नशा केली जात आहे. यामुळे तरुण जवळपास दहा ते १२ तास नशेत राहतात असे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे या भागात सध्या कंडोमची विक्री वाढलेली आहे. कंडोमच्या वाढत्या विक्रीबाबत दुर्गापूरमधील एका औषध विक्रेत्याने प्रतिक्रिया दिलेली आहे. “पूर्वी दिवसभरात एका औषध विक्रेत्याचे तीन ते चार कंडोमचे पॉकेट विकले जायचे. मात्र आता ही विक्री वाढली आहे,” असे औषध विक्रेत्याने सांगितले आहे.