आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. रशियातील पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत वाघांची संख्या असलेले १३ देश सहभागी झाले होते. प्रत्येकाने २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. चांगली गोष्ट म्हणजे भारताने २०१८ मध्येच हे लक्ष्य गाठले होते. २०१८ मध्ये भारतात वाघांची संख्या २९६७ च्या वर गेली होती. जागतिक वन्यजीव निधीनुसार, गेल्या १५० वर्षांत वाघांची संख्या सुमारे ९५ टक्क्यांनी घटली आहे.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची थीम होती – “त्यांचे जगणे आपल्या हातात आहे.” यावर्षी थीम जाहीर करण्यात आली नाही. या दिवशी वाघांच्या संवर्धनासंबंधी चर्चासत्र आयोजित केले जातात. जेणेकरून लोकांना यासंबंधी अधिकाधिक माहिती मिळेल. याशिवाय वाघांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगीही दिली जाते.