ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. आता त्यांना ईडी कार्यालयात नेऊन पुढील चौकशी आणि प्रश्नोत्तरे होणार आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”