नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलवलेल्या एकाही काँग्रेस नेत्याने ‘असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ आणि ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबतचे निर्णय दिवंगत मोतीलाल वोरा यांनी घेतल्याचे दस्तावेज अथवा पुरावे दिले नाहीत, अशी माहिती ईडीशी संबंधित सूत्रांनी दिली आहे. वोरा हे काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक काळ कार्यरत असलेले खजिनदार होते. त्यांचा २०२० साली मृत्यू झाला होता.
महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही प्रकरणांमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या दोन्ही संस्थांचे आर्थिक व्यवहार वोरा हेच सांभाळत असल्याची माहिती राहुल गांधींनी ईडीला दिली होती. याशिवाय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि पवन कुमार बंसल यांनीही ईडी चौकशीत वोरा यांचेच नाव घेतले होते. यंग इंडियन कंपनीचे एकमेव कर्मचारी असल्याने संसदेचे अधिवेशन सुरू असताना खरगे यांना ईडीने नाइलाजास्तोवर चौकशीला बोलवले होते. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसच्या मालकीच्या दिल्लीस्थित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या परिसरात असलेले यंग इंडिया कंपनीचे कार्यालय तात्पुरते सील करण्यात आले आहे.