मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीतूनच संजय राऊतांनी आपल्या मित्रपक्षांना पत्र लिहिले आहे. ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याबद्दल राऊतांनी त्यांचे आभार मानले आहेत.ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी संजय राऊत यांना पाठिंबा दर्शवला होता. कृती आणि विचारामधून पाठिंबा दिल्यामुळे मी मित्रपक्षांचे आभार मानतो, असं संजय राऊतांनी पत्रात लिहिलं आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना राऊतांनी पत्र लिहिलं आहे. रडायचं नाही लढायचं अशी बाळासाहेब ठाकरेंची नेहमीच शिकवण राहिली आहे. ही शिकवण घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. माझ्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यावेळेस सगळ्याच मित्रपक्षांनी मला पाठिंबा दिला. विशेष: काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्वीट करत या कारवाईचा निषेध केला होता. यापुढेही आपल्यावर अशा प्रकारच्या कारवाई होत राहतील आणि आपल्यावर दबाब येत राहील. मात्र, आपण न घाबरता लढत राहिलं पाहिजे, असे राऊतांनी पत्रात लिहिलं आहे.