
अकोला: येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सहसंपादक आतिश सुरेश सोसे यांनी लिहिलेल्या २००९ या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’या जीवनचरित्रपर पुस्तकावर सलग तेरा वर्ष अथक प्रयत्न करुन या पुस्तकाचे मूळ मराठी भाषेतील पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय भाषा,भारतीय भाषा,बोली भाषा अशा एकूण चोवीस भाषांमध्ये,ब्रेल लिपी आणि मोडी लिपी मध्ये तसेच अकोला येथील प्रसिध्द नाट्यलेखिका तथा या अनुवाद प्रकल्पाच्या प्रकल्पप्रमुख असलेल्या प्रा.दीपाली सोसे यांनी लिहिलेले नाट्यरुपांतर,पुणे विद्यापीठाने केलेली या पुस्तकावरील ध्वनिफित,मुंबईवरुन प्रसिध्द अभिवाचन ध्वनिफित असा संपूर्ण प्रकल्प प्रकाशक संगीता अनिल चव्हाण,श्वेता चव्हाण यांनी पाणिनी प्रकाशन,ठाणे या एकाच प्रकाशनाने प्रकाशित करीत एकाच पुस्तकावर आणि त्याचेही एकाचवेळी एकाच व्यासपीठावर प्रकाशन होणे,हे ऐतिहासिक नोंदीच्या दिशेने टाकलेले यशस्वी पाऊल आहे,असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी काढले.
‘मातोश्री’भवन,मुंबई येथे दि.९ आँगस्ट रोजी प्रसिध्द लेखक आतिश सुरेश सोसे यांच्या ‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’या ऐतिहासिक प्रकल्प असलेल्या पाणिनी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अठ्ठावीस पुस्तकांचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रकाशक संगीता चव्हाण,या प्रकल्पाच्या प्रमुख,नाट्यलेखिका प्रा.दीपाली आतिश सोसे,पोलीस अधिकारी नरेंद्र डंबाळे,ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एस.एस.सोसे,श्रीकांत चव्हाण,बालकलाकार स्वराज सोसे,अद्विक सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुस्तकाचे अनुवाद प्रीती भार्गव(जर्मन),हेमांगी कडू(इंग्रजी),श्रृती गुप्ता(हिंदी),समीरा गुजर(संस्कृत),रुची दीक्षित(गुजराती),शोभा देवाडिगा(कन्नड),शेख इन्शियात अहमद,अजिज अहमद(उर्दू),व्ही.चित्रा(तमिळ),विश्वनाथ तुडू(सांताली),ज्ञानप्रकाश आर्य(भोजपुरी),दीपिका आरोंदेकर(कोंकणी),रमेश सूर्यवंशी(अहिराणी),हरिश्र्चंद्र बोरकर(झाडीबोली),माया धुप्पड(मारवाडी),राहुल भगत(वर्हाडी),सूर्यकांत राऊळ(मालवणी),दीपक माहितकर(हलबी),अजिज तडवी(तडवी),सुरेश यशवंत(लेवा गणबोली),विष्णू राठोड(बंजारा),पी.बी.सोनवाणे(पारधी),पुष्पा गावित(भिल्लोरी),चंद्रकला गायकवाड(कैकाडी),माहेश्वरी गावित(मावची),दीपाली सोसे(नाट्यरुपांतर),पुणे विद्यापीठ धनंजय भोळे(ध्वनिफित),प्रशांत दळवी(मोडी लिपी),विशाल कोरडे(ब्रेल लिपी),माधुरी नाईक(अभिवाचन ध्वनिफित),तेजस चव्हाण(कविता संगीतबद्ध) यांनी केले आहे.
मराठी साहित्यातील एकाच पुस्तकावर एवढे उपक्रम,अनुवाद असलेले हे एकमेव पुस्तक असल्याने या पुस्तक प्रकल्पाची इतिहासात नोंद घेतली जाईल,असे गौरवोग्दार यावेळी पाहुण्यांनी काढले.
लवकरच ठाणे येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यामध्ये या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा व अनुवादकांचा सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती प्रकाशक संगीता चव्हाण,श्वेता चव्हाण,प्रेमकिशोर झंवर,श्वेता शिंदे यांनी दिली आहे.
आजवर आतिश सोसे यांची पंचाहत्तर पुस्तके प्रकाशित असून पुस्तकांच्या दोन ते दहा आवृत्त्यांपर्यंत झेप घेतली आहे.त्यांच्या या लेखनकार्याने अकोला जिल्ह्यासाठीही ही ऐतिहासिक सन्मानाची बाब असल्याची भावना साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
——————————————