अल्पवयीन मुलीवर अत्याचार: डीएनए रिपोर्ट मात्र निगेटिव्ह

Crime

 
अकोला :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नंतर अनैतिक संबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी डीएनए अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, अत्याचार झाला असून पीडित ही अल्पवयीन आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षाने केल्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) सुनील पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देविदास उत्तम ढोके (रा. पातूर तालुका) असे आरोपीचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पातूर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. देविदास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी देविदासविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रकरण सुरू असताना गुणसूत्र (डीएनए) अहवाल आला. तो नकारार्थी होता. त्यात बालकाचे मातृत्व सिद्ध झाले; पण पितृत्व नाही. हे प्रकरण पीडितेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे असून, बालकांचे पालकत्व सिद्ध करण्याचे नाही, असा युक्तीवाद सरकारी वकील आनंद गोदे यांनी केला. तो न्यायालयात ग्राह्य धरला. पीडिता अल्पवयीन बालिका असून, तिच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे सरकार पक्षाने सिद्ध केले. सरकारी पक्षातर्फे वकील आनंद गोदे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला भादंविचे कलम ३७६, ४५०, ५०६ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षणचे कलम तीन, चार, पाच, सहा कलमांअंतर्गत दोषी ठरवले.लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्याचे कलम तीनसह कलम चार अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण या कायद्याचे कलम पाचसह कलम सहा अंतर्गत २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधी कैद सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *