मुंबई : जिथं शिक्षकांना घडवलं जातं, त्या विद्यामंदिरातील मुख्याध्यापिकेविरोधातच सनसनाटी आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिकेविरोधात पोलीस तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी सह विद्यार्थीनींच्या जातीवरुन शेरेबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थीनींनीच याप्रकरणी पोलीस तक्रार दिली आहे. धोबी तलाव इथं असलेल्या सरकारी कॉलेजात घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. धोबी तलाव येथील गव्हर्नमेन्ट ऑफ महाराष्ट्र सेकेंडरी ट्रेनिंग कॉलेजमधील विद्यार्थीनींनी उर्मिला परळीकर यांच्या विरोधात तक्रार दिली. परळीकर यांनी मुलींच्या प्रायव्हेट पार्टसह त्यांच्या जातीवरुन शेरेबाजी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सुरुवातील या प्रकरणी आधी एनएसयुआचे मुंबई व्हाईल प्रेसिडंट असलेल्या फैजल शैख यांच्याकडे विद्यार्थींनींनी तक्रार दिली. त्यानंतर झालेल्या एका बैठकीनंतर रितसर आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून याप्रकरणी मुख्याध्यापक विरोधात विद्यार्थ्यांच्या सार्वभोमत्त्वाला बाधा पोहोचेल, अशी भाषा वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसंच अश्लिल आणि आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली असून विद्यार्थीनींना जाणिवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिली मुख्याध्यापकांकडून दिली गेली. जातिवाचक टिप्पणी केली गेली, मुख्याध्यापक उर्मिला परळीकर यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मुख्याध्यापक शिक्षिकेचं निलंबन करावं, अशी मागणी एनएसयुआयकडून करण्यात आली आहे. तसे पत्रही त्यांनी शिक्षण संचालकांना दिलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालयातील सात विद्यार्थीनींनी या शिक्षिकेविरोधात तक्रार दिली होती. मुख्यध्यापक उर्मिला परळीकर यांनी अश्लिल आणि वर्णद्वेषी शेरेबाजी केली, असा त्यांचा आरोप केला. दरम्यान, परळीकर यांनी आपल्यावर आरोप फेटाळून लावले आहेत.तक्रारदार विद्यार्थी आदिवासी समाजातील असून त्यांना परळीकर यांनी आक्षेपार्ह आणि अश्लिल प्रश्न विचारले होते. ‘हस्तमैथुन चांगले की लग्नाआधी संभोग करणं चांगलं’ या प्रस्नाला 1 ते 5 पैकी गुण देऊन आपण दिलेल्या गुणांमागील कारणं काय, असा प्रश्न केला असल्याचं तक्रारदार विद्यार्थीनीने म्हटलंय. 24 जून रोजी एका विद्यार्थीनीवर परळीकर यांनी संताप व्यक्त केला होता. उद्या मी शिक्षक झाल्यावर विद्यार्थ्यांना आदिवासी भाषेत शिकवेन का, असं म्हणत त्यांनी विद्यार्थीनींना भर वर्गात सुनावलं होतं. तसंचं तुमचे शिक्षकही तुमच्यासारखेच आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारल्याचं तक्रारदार विद्यार्थीनीने म्हटलं.दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी एका विद्यार्थीनीने गणवेशात बदल करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर उत्तर देताना अश्लील भाषेत प्रायव्हेट पार्टबद्दल मुख्याध्यापकांनी आक्षेपार्ह मत नोंदवलं होतं. विद्यार्थीनींचा गणवेश सफेद कुर्ता आणि जीन्स किंवा लेगिन्स असा करावा, अशी विनंती वजा मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना, शिक्षकेनं पातळी सोडून उत्तर दिलं होतं. कुर्ता जेव्हा उडेल तेव्हा तुमचे प्रायव्हेट पार्ट (मांडी, छाती, इत्यादी) सगळ्यांना दिसेल, असं म्हणत मी गणवेश बदलणार नाही, असं शिक्षिकेने म्हटलं होतं. यानंतर अस्वस्थ झालेल्या आणि प्रचंड संतापलेल्या मुलींनी अखेर पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला.