नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शुक्रवारी ही घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी पिंपळगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल नाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्र लेन बंद असल्याने त्यांनी गाडी दुसऱ्या लेनमध्ये नेली. परंतु १५ ते २० मिनिटं होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षकांशी हुज्जत घालत अरेरावी केली. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या.पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. दरम्यान कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून प्रचलित असलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून परतत होते. त्यावेळी पिंपळगाव टोल नाक्यावर हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत आता पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला आवर घालण्यासाठी आता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.