जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेवर कार्यरत सहायक शिक्षकाच्या असभ्य वर्तणुकीचा शुक्रवारी पर्दाफाश झाल्यानंतर शनिवारी काकरमल येथून धारणीत दाखल झालेल्या संतप्त पालकांनी महाराष्ट्र जनक्रांती सेनेच्या नेतृत्वात पंचायत समितीला घेराव घातला. त्या दारुड्या शिक्षकास त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली. धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल येथील शाळेचे सहाय्यक शिक्षक पृथ्वीराज नेतराम चव्हाण हे शालेय वेळेत चक्क दारु ढोसून, वर्गातील टेबलावर पाय ठेऊन खुर्चीवर निद्रा घेत होते. त्यांची ही स्थिती कॅमेराबद्ध केल्यानंतर संबंधित उच्चाधिकाऱ्यांना दाखवली. दरम्यान, शिक्षकी पेशास मलीन करणाऱ्या त्या दारुड्या शिक्षकांवर फौजदारी कारवाई करुन त्यास निलंबित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली. महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या कठोर भूमिकेमुळे शेवटी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी त्या दारुड्या शिक्षकाविरुद्ध असभ्य वर्तणुकीसह कर्तव्यसेवेत बेजबाबदार दिसून आल्याचा ठपका ठेवला.