राज्याचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. काल (२३ ऑगस्ट) विधानसभेच्या सभागृहात मंत्र्यांच्या उपस्थितीवरून चांगलाच गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान आजदेखील विधानपरिषदेमध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री नसल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी हे चालणार नाही म्हणत कामकाज १० मिनिटांसाठी थांबवण्याची मागणी केली.
“सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री नाहीत. प्रश्नाच्या उत्तराला दुसऱ्याच खात्याचे मंत्री उत्तर देत आहेत. तुमच्याकडे एखादे खाते दिले असेल तर त्या खात्याचा निदान परिचय करून दिला पाहीजे. सामूहिक जबाबदारी असली तरी आम्हाला तुमच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी आहे, हे कसे माहीत होणार?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला..
“गृहनिर्माण मंत्री कुठे आहेत. मागच्या प्रश्नालादेखील मंत्री नव्हते. हा मंत्र्यांचा नव्हे तर प्रश्नोत्तराचा प्रश्न आहे. ज्या खात्याबाबत प्रश्न विचारला आहे, त्या खात्याचे मंत्री नाहीयेत. सभागृह दहा मिनिटे बंद करा. हे असे चालणार नाही,” असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सभागृहाचे कामकाज थांबवण्याची मागणी केली
दरम्यान, खडसे आक्रमक झाल्यानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी आपापल्या आसनांवरून उठले. परिणामी गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेच्या सभापतींनी कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केले.