तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? समीर वानखेडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Maharashtra State

ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत राहिलेले मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीम येथे आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना वानखेडे कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर समीर वानखेडे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं.

राजकारणात येण्याबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी भारताचा एक सेवक आहे आणि सर्वप्रकारे सेवा करत राहीन.”

“तुमचा भाजपाशी संबंध आहे या आरोपावर काय सांगाल?”
भाजपाशी संबंध असल्याच्या आरोपाबाबत विचारलं असता समीर वानखेडे म्हणाले, “मी कायदा पाळणारा माणूस आहे आणि केवळ संविधानाचं पालन करतो.”

“आरोप करणारे मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता?”
या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी आणि त्यांच्या अटकेवरही प्रश्न केला. “तुमच्यावर आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि तुम्ही बाहेर आहात याकडे कसं बघता?”, असा प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, “त्या व्यक्तीविषयी मला काहीही भाष्य करायचं नाही. त्यांनी माझ्यावर खालच्या स्तरावरील आरोप केले होते. त्यामुळे मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही.”

“पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का?”
पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “मला भारतात कुठेही पाठवलं तरी मी काम करेन. मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे.”

आर्यन खानला न्यायालयाने क्लीन चिट दिली त्यावर काय सांगाल, क्लीन चिट मिळाली म्हणजे तपासात कमी पडले का? असेही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर वानखेडे म्हणाले, “ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी एनसीबीत कार्यरत देखील नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *