एसटी महामंडळाच्या विविध प्रकारातील सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठांना एक नोव्हेंबरपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी स्मार्ट कार्ड काढून देण्याची मुदत अखेर संपणार आहे. यापूर्वी शासनाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा ही तिसरी असणार आहे. बसच्या सवलतीचा लाभ दिव्यांग, विविध योजना, पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिकांसह कर्करोग, एचआयव्ही बाधित आणि थॅलेसिमियाग्रस्तानाही मिळतो.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त, अधिस्वीकृतीधारक अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया उपक्रमात हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २०१८-१९ मध्ये सवलत धारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. ती लागू झाल्यानंतर विना कार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही प्रवास सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले. तेव्हापासून विविध कारणांमुळे योजनेला मुदतवाढ मिळत आहे. नुकत्याच झालेल्या सहा महिन्यांच्या संपकाळात कार्डनोंदणी-वितरण व्यवस्था पूर्णपणे बंद होती. आता ती सुरू झाली असली तरी विविध बाबींचा विचार करून स्मार्ट कार्ड बाबीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यातील अनेक विभागीय कार्यालयाकडून पाठवण्यात आले होते.