झारखंड: झारखंडमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युतीचे आमदार मंगळवारी दुपारी रांचीहून रायपूरसाठी रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार सध्या छत्तीसगडच्या राजधानीतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
झारखंडमध्ये देखील आता भाजप ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मागील काही दिवसांपुर्वी दिल्लीमधील आपच्या आमदारांना भाजपने पळविल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ‘दिल्लीतील सरकार पाडून तिथे भाजपला ‘ऑपरेशन लॉटस’ यशस्वी करायचं होतं,’ असा आरोप देखील आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता.
अशातच आता झारखंडमध्येही सत्ताधारी गटातील आमदारांना फोडून सरकार अस्थीर होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षातील आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘मेफेअर गोल्ड रिसॉर्ट’ या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, हे हॉटेल दोन दिवसांसाठी बुक करण्यात आलं आहे. या सर्व आमदारांसोबत सोरेन देखील रांची विमानतळावर पोहोचले असून सध्या सत्ताधारी गटातील ३१ आमदार रायपूरला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
माध्यमांशी बोलताना सोरेन म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. कोणतीही अनपेक्षित घटना घडणार नाही. आम्ही सर्व गोष्टींसाठी तयार आहोत, परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. मीही आमदारांसोबत जाणार आहे की नाही हे देखील लवकरच कळवतो.’
सोरेन यांनी रविवारी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांची भेट घेऊन राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. भारतीय निवडणूक आयोगाने झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना खाण लीज प्रकरणात सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस करणारे पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.