आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातही भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन 45’ साठी तयारी केली आहे. राज्यात शिंदे गटाच्या १२ खासदारांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात काँग्रेस अद्याप पक्षाचा अध्यक्ष निवडण्यात मश्गुल आहे. याचदम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना जिंकण्यासाठी रणनीतीच सांगितली आहे. शरद पवार म्हणाले, ‘ आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक विरोधी पक्ष एकत्र येऊन लढू शकतात. विरोधी पक्ष हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र येऊ शकतात’.
दरम्यान, शरद पवार यांनी स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच देशाच्या सत्तेची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची केंद्राच्या सत्तेत कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा देखील नाही. तसेच शरद पवार यांनी सर्व केंद्र सरकारच्या विरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.दरम्यान, शरद पवार यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी विरोधी पक्षांचे नेतृत्व कोण करणार ? यावरून अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा झाल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढविल्या आहेत. शरद पवारांच्या या प्रयत्नाला कितपत यश येईल, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.