कोल्हापूर – एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली.
सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र आता शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे हे शिंदे गटातून स्वगृही परतले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये 15 दिवसांपूर्वी दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
तसेच आपण सतेज पाटील, मालोजीराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे फराकटे यांनी स्पष्ट केलं आहे. फराकटे यांनी एक पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे.