केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच, सध्या मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांची गाठीभेटी वाढल्याचेही दिसत आहे, यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेला सोबत घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. एवढंच नाहीतर मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होईल. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.रामदास आठवले म्हणाले, “माझं मत असं आहे की मनसेची काही आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. आता एकनाथ शिंदेंचा गट देखील आपल्या सोबत आलेला आहे. मागील वेळी शिवसेना आणि आम्ही स्वतंत्र लढलो होतो. भाजपी आणि आरपीआय एकत्र आणि शिवसेना वेगळी लढली होती. तरी देखील भाजपा आणि आरपीआयने जवळपास ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्या सोबत आलेली असल्याने, आम्हाला मुंबई महापालिका निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.