बुलढाण्यात शिवसेना व शिंदेगटात तुफान राडा; पोलिसांसमोरच धक्काबुक्की, हाणामारी

बुलढाणा

आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले. आज बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यासंदर्भात अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी पोबारा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *