
दसऱ्या मेळाव्यावरील वादावर पवारांनी दिला सल्ला
मुंबई : दसरा मेळाव्यावरून एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. अद्यापपर्तंत यावर मुंबई महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर नेमकं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व वादामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असून, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. तसेच वाद टाळावे असा सल्ला दिला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अनिल परब यांच्याकडून 23 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला अर्ज दाखल करण्यात आला आहे. तरस दोन दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे.
आगामी दसऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमकं कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यावर अद्यापपर्यंत ठोस असा कोणताच निर्णय झालेला नाही. तोच शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी मेळावा घ्यावा अशी भावनिक साद मनसैनिकांकडून राज ठाकरेंना पत्राद्वारे करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र ट्वीट केले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात या वादावर शरद पवार यांनीदेखील भाष्य करत वाद टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे शिंदे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.