बुलढाणा – शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला. यामध्ये शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाला इशारा दिला आहे. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ठाकरे गटातील लोक पातळी सोडून टीका करत आहेत. आता तर राडा कमी झाला. पोलिसांनी थांबवलं. आमचे कार्यकर्ते खूप जमा होते. आम्हाला चिथावणीखोर भाषा वापरता परंतु त्यांना संजय गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते माहिती नाही. यानंतर जर अशाप्रकारे विधाने केली तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे असा इशारा त्यांनी दिला आहे.