देशातील महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. रॅलीमध्ये बेरोजगारी आणि वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वरुनही काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.काँग्रेसची ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर ३.५०० किमी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु होण्यापूर्वी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान, राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी देशभर प्रवास करणार आहेत. ‘भारत जोडो यात्रा’ हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क यात्रा आहे. ज्यामध्ये पक्षाचे नेते तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर असून पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत परदेशात आहेत. त्यामुळे त्या दोन्ही रॅलीत सहभागी होऊ शकणार नाहीत.महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. त्यावर सर्व मंचांवर चर्चा झाली पाहिजे. पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद हे देखील जम्मूतील सैनिक फार्म येथे पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.