२०२२ मध्ये अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ असे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अक्षयच्या आगामी चित्रपटांवर देखील पडला. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या बॉलिवूडविरोधी ट्रेंडमुळे चित्रपट पुढे धकलण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला. काहींनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. या सगळ्यात अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ हा नवा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
‘कटपुतली’ चित्रपट २०१८ सालच्या ‘रत्सासन’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह, सरगुन मेहता, चंद्रचूर सिंह, गुरप्रीत घुग्गी असे कलाकार आहेत. या व्यतिरिक्त पंजाबी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकार देखील या चित्रपटामध्ये झळकले आहेत. सायको किलर या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘कटपुतली’ चित्रपटाची कथा ‘कसौली’ येथे राहणाऱ्या एका होतकरु लेखकाच्या अवतीभवती फिरते. सध्या अक्षयला त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ‘कटपुतली’च्या निमित्ताने आणखी एक रिमेक तयार केल्यामुळेही त्याच्यावर टीका होत आहेत.