शिक्षणाची दिशाहीन वाटचाल

अकोला

-प्रा. प्रशांत पळसपगार
उप संपादक – सिटी न्यूज सुपरफास्ट अकोला

पूर्वीच्या काळातील शिक्षण पद्धती आणि आजच्या काळातील शिक्षण पद्धती यामध्ये फार मोठे अंतर आहे. परिस्थितीनुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे काळाची गरज आहे मात्र उद्देश हा कायम राहणे तेवढेच गरजेचे आहे आज दुर्दैवाने असे म्हणावे लागते की शिक्षण पद्धतीमध्ये पण बदल तर झालाच सोबत शिक्षणाचे उद्देश देखील फार बदलून टाकण्यात आले आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड मेकॉले यांनी ई स १८३५ मध्ये भारतामध्ये शिक्षण पद्धती जी सुरू केली त्या शिक्षणपद्धतीला मेकॉले शिक्षण पद्धती असे नाव देण्यात आले या शिक्षणाचा उद्देश केवळ या देशांमध्ये कारकून आणि सांगकामे निर्माण करणे हाच होता आज देशाला स्वतंत्र होऊन सात शतक दशक पार पडली मात्र शिक्षणाच्या पद्धतीमध्ये कोणताच बदल घडून आला नाही, हि खूप लाजिरवाणी बाब असल्याचे दिसते. आज शिक्षणाचे मूल्य वाढले नसून शिक्षण साहित्याचे मूल्ये एवढे वाढले आहे कि सर्वसामान्य मनुष्य शिक्षणाचा विचार पण करू शकत नाही, एकीकडे शिक्षण मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ठ करण्यात आले आणि दुसरीकडे शिक्षणाचे मोठ्याप्रमाणात खाजगीकरण करून दर्जेदार शिक्षणापासून सामान्य विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जाते.
वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये शिक्षण पद्धतीचा गेल्या बारा वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे मी अनुभव घेतला आहे आज गुणवत्ता, विषयाचे ज्ञान, तुमच्या मध्ये असलेली, प्रतिभाशक्ती, आवड या सर्व बाबी आज निकामी ठरले आहेत कारण या सर्व बाबींना तोडणारा पैसा आज शिक्षण पद्धतीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे, आज महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था उभारलेल्या आहेत जे स्वतःला शिक्षण सम्राट समजतात मात्र यांची जर वास्तविकता पाहणी तर केवळ पिढ्यान पिढ्या बसून कसे खाता येईल यासाठी पुंजी जमा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक संस्था झपाट्याने आर्थिक लूट करत आहेत. समाजामध्ये सर्वगुण संपन्न पिढी निर्माण करणे किंवा विद्यार्थी घडवणे हा उद्देश आजच्या शिक्षणसम्राटांसमोरच्या अजिबात दिसत नाही.
आज आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नव्हे तर पूर्ण भारतात शिक्षकाकडे आणि शिक्षणाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याच सकारात्मक आहे मात्र गेल्या काही दशकांमध्ये आज शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक पळवाटा काढल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे आज दुर्दैवाने असे सांगावे लागते की शिक्षक अध्ययन अध्यापनाचे कार्य सोडले तर इतर क्षेत्रांमध्ये वरचढ करत असल्याचे दिसत आहे,आज शिक्षक मोठ्याप्रमाणात राजकारणाकडे वळलेला दिसतो, शिक्षक विविध संघटना स्थापना करून समाजामध्ये आपले वर्चस्व दाखवतात, निवडणुकीच्या दरम्यान अनेक शिक्षक पक्ष्यांच्या नेतेमंडळीसोबत सर्रास विविध कार्यक्रमामध्ये फिरतांना दिसतात यांना कोणाचेही भय का नसते असा प्रश्न सर्वांना पडणारा आहे.

      विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या खिचडी पासून तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती पर्यंत आज शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर होत असल्याचे दिसत आहे सोबतच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुद्धा केला जातो, आज बहुसंख्य शिक्षण संस्थांमध्ये विकत घेतलेल्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा शिक्षणापासून विद्यार्थी निर्माण होण्याची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे याचा विचार समाजाने करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र मध्ये शिक्षक होण्यासाठी तुमच्यामध्ये गुणवत्ता किंवा अनुभव महत्वाचे नसून कागदपत्रांची पूर्तता आणि नोटांचे बंडल ही सर्वात मोठी पात्रता आहे ज्यामुळे समाजामध्ये दिशाहीन शिक्षक निर्माण होत असल्याचे मोठे दुःख आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काही प्रमाणात आजही प्रामाणिक होतकरू प्रतिभावंत अनुभवी, काही तरी करून दाखवण्याची उमेद असलेले,विद्यार्थी घडवण्याची जिद्द असलेले शिक्षक देखील आहेत आणि शिक्षण संस्था देखील आहे. अशा शिक्षकांना आणि शिक्षण संस्थांना मी आणि समाज नेहमी नतमस्तक राहणार मात्र समाजामध्ये आज विशिष्ट वर्ग असा आहे की ज्या मध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे मात्र शिक्षक बनण्याची आवड, विषयज्ञान, कौशल्य, प्रतिभाशक्ती अशा अनेक गुणांचा अभाव असल्यामुळे आणि मोठ्याप्रमाणात शिक्षक होण्यासाठी रक्कम मोजावी लागल्यामुळे शिकविण्यात अजिबात रस नसल्यामुळे असे शिक्षक विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या साह्याने आपलं दैनंदिन कार्य पार पाडत असतात.

     आपला समाज शिक्षकांकडे मोठ्या आशेने पाहतो शासनाने प्रत्येक घरांमध्ये ज्ञानाची गंगा जावी याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च करून जिल्हा पातळीपासून तर गावं पातळीपर्यंत शाळा सुरू केल्या सोबतच खाजगी शाळांना देखील मान्यता दिल्या मात्र आज चित्र खूप वेगळे दिसते ज्या शासकीय शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थीसंख्या नसून बहुतांश विद्यार्थी हे खासगी शाळेकडे मार्गक्रमण करतांना दिसतात तरीसुद्धा शासनाकडून लाखो रुपये महिन्याचे वेतन काही न करता शिक्षकांना दिल्या जात असल्याचे दिसते ,काही न करता याचा अर्थ शिक्षक ज्या उद्देशाने नियुक्त केलेला आहे तो उद्देश सोडून शासन बाकीच्या गोष्टी मध्ये आता शिक्षकांना कामाला लावत असल्याचे दिसते ही बाब मोठी खेदजनक आहे,

आज प्रत्येक गावांमध्ये अनेक शाळा आहेत मात्र त्या गावांमध्ये आवश्यक सुविधा नसल्यामुळे अशा ठिकाणी नियुक्त केलेले शिक्षक राहण्यास तयार नसल्याचे दिसते तालुक्याच्या ठिकाणी अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व सुविधा युक्त भागात हे शिक्षक राहण्याला प्राधान्य देतात लाखो रुपये पगार असल्यामुळे आवश्यक ते वाहन खरेदी करून किंवा शासनाच्या परिवहन महामंडळाच्या बसेस चा उपयोग करून हे शिक्षक शाळेमध्ये जाणे येणे करतात याबाबतीत अनेक गावांमध्ये अनेक वेळा वादंग निर्माण झाले मात्र यांच्या पाठीशी असणाऱ्या संघटना ज्या संघटना राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत अशांना प्रशासन हतबल होऊन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक हा शाळेपासून कोसो दूर राहून ज्ञानदानाचे कार्य करताना दिसतात हे मात्र आश्चर्य.

     औरंगाबाद येथील आमदार प्रशांत बंब यांनी नुकताच अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की शिक्षकांना घरभाडे भत्ता मिळतो मात्र बहुतांशी शिक्षक हा शाळेच्या कोसो दूर राहून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतो अशावेळी ज्या शिक्षकांना घरभाडे भत्ता देऊन शासनाची तिजोरीखाली केल्याचे बोलले, आज कोट्यवधीचा खर्च होत आहे. घरभाडे भत्ता शिक्षकांना देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या या मुद्द्याचा कुठले प्रकारचा विचार शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांनी न करता त्यांच्या बोलण्याचा निषेध नोंदविला आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे कोणापासून लपलेली नाही. आज देशामध्ये  शिक्षण हा सर्वात मोठा व्यवसाय बनलेला आहे तसेच आर्थिक उलाढालीचे  सर्वात मोठे केंद्र बनले आहे दरवर्षी शासकीय आणि खाजगी शाळांमधील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल  होत असल्याचे दिसते, आज महाराष्ट्र मध्ये प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत शिक्षक भरती करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात शिक्षकांमध्ये गुणवत्ता महत्त्वाची नसून आर्थिक क्षमता पाहिली जाते अशा शिक्षकांन पासून विद्यार्थी घडण्याची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे याचा सारासार विचार समाजाने करायला पाहिजे

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो नक्कीच गुर-गुरणार असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे मात्र आजचे शिक्षण हे भेसळयुक्त दूध आहे पिणार तो नक्कीच भ्रस्टाचार करणार असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही कारण शिक्षण क्षेत्रामध्ये वेळेचा आणि पैशाचा भ्रष्टचार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते, जे शिक्षक विद्यार्थ्यांना निश्चित वेळेत न शिकवता केवळ वेळ मारून नेण्याचे कार्य करत असतील तर ते सर्वात मोठा प्रमाणात भ्रष्टचार करत असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया गेल्या अनेक शतकापासून चालू आहे या मध्ये दिवसेंदिवस गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. पालकांना देखील आर्थिक भुर्दंड आवाक्याबाहेर टाळावा शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त अन्य कोणतेही कार्य देण्यात येऊ नये. गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर कार्य करायला पाहिजे. आज अनेक शैक्षणिक संघटना कार्यरत आहे त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन चांगल्या पिढ्या निर्माण करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित करायला पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ता पाहून शिक्षकांची नियुक्ती करायला पाहिजे ज्यामुळे दर्जेदार शिक्षण घरोघरी पोहचणार आणि हे सर्व ज्या दिवशी होणार तोच खरा शिक्षक दिन ठरणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *