संजय राऊतांचा ‘आर्थर रोड’ जेलमधील मुक्काम वाढला

Maharashtra State

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळय़ाप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्या वेळी त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ नुसार राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. यानंतर न्यायालयीन कोठडीच ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला ४१४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *