स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

Maharashtra State

मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश हिंदू स्मशानभूमीमध्ये पीएनजीवर आधारित शव दाहिनी आणि विद्युत दाहिनी सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात आजही चितेवरील अंत्यसंस्कारांकडेच नातेवाईकांचा कल आहे. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाची मागणी वाढतच आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. दोन वर्षांसाठी ४ लाख क्विंटलहून अधिक लाकडांचा पुरवठा करावा लागणार आहे.शहर आणि उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या व खाजगी अशा एकूण ४९ हिंदू स्मशानभूमी असून मुंबई महानगरपालिकेकडून या स्मशानभूमींना मोफत जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्यात येतो. महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी स्मशानभूमींना जळाऊ लाकूड पुरवण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमधील विद्युतदाहिनी यापुढे पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) दाहिनीमध्ये परार्वितत करण्यात येणार आहेत. तसेच सर्व स्मशानभूमीमध्ये पीएनजी दाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. त्यामुळे यापुढे पार्थिवाचे दहन विजेऐवजी गॅसवर आधारित दाहिनीत होणार आहे. यामुळे विजेची बचत होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हासही टाळणे शक्य होईल. मात्र अजही अंत्यसंस्कारांसाठी लाकडांची चिता रचण्याचा पारंपरिक पर्याय निवडण्याकडे नातेवाईकांचा कल आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने ४९ स्मशानभूमींना ४ लाख ३१ हजार ५३२ क्विंटल जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे.हिंदू स्मशानभूमीमध्ये जळाऊ लाकडांचा मोफत पुरवठा केला जातो. सुमारे ८०० रुपये प्रति १०० किलो या दराने प्रति मृतदेह दहनासाठी २३४९ रुपये किंमतीचे ३०० किलो लाकूड मोफत पुरवले जाते. एवढे लाकूड हे सामान्यपणे २ झाडांपासून मिळते.

महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत पारंपरिक दहन स्मशानभूमी, विद्युत स्मशानभूमी आणि पीएनजीवर आधारित स्मशानभूमींचा समावेश आहे.
पारंपारिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चिता – स्थाने आहेत. तर ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून तिथे १८ शवदाहिनी आहेत. मुंबईत एकूण २३७ चिता-स्थाने आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *